पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी (एसएससी) आणि बारावी (एचएससी) बोर्ड परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान घेण्यात येतील. त्यानंतर ८ फेब्रुवारीपासून बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होईल.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. दहावीच्या लेखी परीक्षांना १५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.
राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत.
दरम्यान, मंडळाने सध्या परीक्षांचा संभाव्य कालावधी जाहीर केला असून, विषयनिहाय अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम वेळापत्रक आणि पुढील सूचनांसाठी मंडळाच्या अधिकृत घोषणांकडे लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आगाऊ जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास, तसेच शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना परीक्षेच्या तयारीचे वेळापत्रक आखण्यास मदत होणार आहे.
