पुण्यातील अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचा संचालक अमीर सरदार शेख हा हज यात्रेकरूंची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झाला होता. त्यानंतर तब्बल २० दिवसांनी तो काल दि. ३ जून रोजी स्वतः पोलिसांसमोर हजर झाला.
पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे.
अमीर शेख याच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या भागीदारांनी भवानी पेठेतील चुडामण तालिम येथील अल खलीफा टूर अँड ट्रॅव्हल्सचे कार्यालय रिकामे करून गायब झाले होते. यामुळे हज यात्रेकरूंत मोठा संताप निर्माण झाला होता. सद्यस्थितीत अमीर शेख याच्याविरुद्ध ५० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. मात्र अद्यापही अनेक तक्रारदारांनी तक्रार दाखल केलेली नाही. अमीर हजर झाला असला तरी त्याची बायको आणि इतर लोक अद्यापही फरारच आहेत.
अॅड. समीर शेख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. “हिरा गोल्ड प्रकरणात जे घडले त्याचा अनुभव घेऊन आता नागरिकांनी पुढे येऊन तक्रार करावी, न्याय मिळवण्यासाठी तक्रार ही महत्त्वाची आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
पोलिस या प्रकरणात अमीर शेख व त्याच्या साथीदारांवर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







